Sunday, 10 March 2019

सातारची सुपरमॉम:- प्रियांका निकम-शिंदे

एखाद्या माणसाचं यश हे दंतकथा वाटावी असं असतं, आणि ज्यांच्या यशाच्या दंतकथा तयार झालेल्या असतात. त्यांचा संघर्ष पण तितकाच मोठा असतो. सातारा आणि संघर्ष हे नातं तसं जुनंच आहे. पण या संघर्षाला वेदना असतात, काटे असतात. ज्यावेळी वेदना जाग्या होतात, तेव्हा त्याच्या संवेदना होतात, आणि संवेदनांना पंख फुटतात तेव्हा त्याच रूपांतर यशात होतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई असू द्या, लहान बाळासाठी अवघड कडा उतरणारी हिरकणी, छोट्या बाळाला बाजूला ठेऊन रिंगमध्ये उतरणारी मेरी कोम या सगळ्या आदिशक्ती असतील, पण अनेक जणींच्या प्रेरणा आहेत. अशाच नावात समाविष्ठ होणार नवं नाव म्हटलं तर ते अतिशयोक्ती नाही ठरणार, असंच एक नाव, म्हणजे साताऱ्याच्या डोंगरात वसलेलं छोटंसं गावं त्या गावची पूर्वाश्रमीची प्रियांका निकम सध्या सौ. प्रियांका प्रशांत शिंदे.
ध्येयाने झपाटलेल्या माणसाला जस वेड असतं, तसंच आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न मनात घेऊन एका छोट्या खेड्यातून साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजात दाखल झालेली ही मुलगी भूगोल शिकता शिकता आयुष्याचा गोल कसा पूर्ण करता येईल याचं स्वप्न पहाते. पण संघर्ष नाही ते यश कसलं, अडथळे आल्याशिवाय पण यशाची किंमत कळत नाहीत म्हणतात नेमकं तेच झालं. पहिला अडथळा तीन बहिणीनंमध्ये सगळ्यात मोठी आणि ``बस्स झालं शिक्षण" म्हणून हात पिवळ्या झालेल्या हजारो मुलींप्रमाणे हिचापण प्रवास थांबला. खूप मोठ्या स्वप्नाला जसं बंदिस्त करून गाडलं जात नेमकं ते झालं. मनात धुसफूस चालायची बोलता यायचं नाही. एक दिवस मनातील धुसफुशिला, मुसमुसती मोकळी वाट मिळाली, आणि स्वतःच्या आयुष्याच्या जोडीदारासमोर ती व्यक्त झाली.
लग्न झालंय काय कमी आहे? बायकांना काय मिळतं नोकरी करून? मी आहे ना पैसे कमवायला असे जसे प्रश्न इतर घरातून येतात तसे प्रश्न आले नाहीत. साताऱ्याच्या स्व. संदीप गायकवाड सरांकडे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुरू झालं. घर संसार आणि नातेवाईक यांना सांभाळत एका मोठ्या स्वप्नाची वाटचाल सुरू झाली. या वाटेला अपयशाची साथ होतीच. तरीपण न संपणाऱ्या या प्रवासाला संपवण गरजेचं होतं, आणि प्रवास न थांबणारा होता.
स्पर्धा परीक्षेच्या अनिश्चित वातावरणात टाकलेलं पाऊल आणि बाजूच वातावरण यात, स्वतःला न गुंतवता अभ्यास सुरू होता. अशात संसार वेलीवरती एक सुंदर फुल फुललं, आणि 2017 च्या पीएसआय च्या मुख्य परीक्षेत पास होऊन मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरल्याचं समजलं. पुढचा प्रवास अवघड होता. घरात छोटं बाळ आणि साताऱ्यात उलट्या काळजाचा मैदानी प्रशिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनिल सरांकडे प्रशिक्षण घ्यायचं ठरलं. मैदानात एवढी दमछाक व्हायची की बोलता पण यायचं नाही. आदल्या वर्षीच सरांकडे प्रशिक्षण घेतलेली 8 मुलं पीएसआय पास झालेली होती त्यामुळं कितीही त्रास झाला तर चालेल पण माघार घ्यायची नाही हे ठरवूनचं पती प्रशांत, छोटं बाळ या सगळ्यांचा प्रवास सुरु होता. शेवटी रिझल्ट आला आणि ती पास झाली. कोण पास झाली? कोण जिंकलं, कोण हरलं? हे सगळे प्रश्न संपले, हेटाळणीच्या नजरा कौतुकात बदलल्या. प्रवास थांबला का नाही. ती म्हणते प्रवास इथून सुरू झाला आहे, मला लग्नानंतर हे शक्य झालं नसतं, पण प्रशांत यांची साथ चांगली मिळाली. महाराष्ट्रात हजारो मुली आहेत, ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आई वडील त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची संधी देतात. काही यशस्वी होतात, काही होत नाहीत. पण त्यांच्यावर टाकलेला विश्वास जिंकतो. एक दोन वर्षात रिझल्ट नाही आला म्हणून लग्न लावून एखाद्या मुलीला बाहेर काढलं जात ना, तेव्हा तिला वाईट वाटतं. अशी अनेक प्रकरण आहेत, की लग्नानंतर अभ्यास करायला देऊ वगैरे बोलतात आणि नंतर संधी देत नाहीत. यावेळी विचार करा ते अपयश तिच्या एकटीच असतं? ते अपयश तिच्या एकटीच मुळीच नसतं, तिच्याबरोब ते स्वप्न तुम्ही पण बघितलेलं असतं, मग तिचा पराभव, तिच्या अपयशात आपला पण वाटा असतो. मला आनंद आहे, मी लग्नानंतर यश मिळवू शकले. पण प्रत्येक मुलीला प्रशांत सारखा जोडीदार मिळेल याची काय शक्यता? मला वाईट याचं वाटलं माझ्या वडिलांच्या घरी जर हे यश मिळालं असतं तर त्यांची मान आणखी ताठ झाली असती. अशा हजारो मुली स्वतःच्या वडिलांचं स्वप्न, स्वतःच्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत आहेत त्यांना संधी द्या.
एक सुविचार खूप सुंदर आहे, यशाच्या एका आरोळीत अपयशाचे हजारो हुंकार दबलेले असतात. कदाचित तुमच्या मुलीच्या, बहिणीच्या, कोणत्या तरी नातेवाईकांच्या मुलीचं यश असंच कुठंतरी थांबलेलं असेल, त्याला मोकळी वाट करून देण्यासाठी साथ द्या. तुमच्या पासून मदत नाही झाली तर, किमान कौतुकाचे दोन शब्द बोला, पिचलेलं मन कदाचित उभारी घेऊ शकते.
या प्रवासात साथ नाही देता आली तर चालेल पण किमान मार्गातला अडथळा होऊ नका.
तिच्याकडे सांगण्यासारखं, बोलण्यासारखं खूप आहे, पण तिला, तुला सातारची सुपरमॉम असं म्हटलं तर काय वाटेल, असं विचारलं तर ती म्हणते सुपरमॉम म्हटलं याचा आनंद आहेच, पण मला बाबांची सुपरगर्ल म्हणून घ्यायला नक्कीचं आवडलं असतं. तिनं ठरवलं आहे, तिच्या दोन बहिणींना अधिकारी करूनच लग्न करून सासरी पाठवायचं, आणि फक्त तिच्या दोनच बहिणी नाहीत तर महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सर्व बहिणींसाठी ते हे करायला तयार आहे, कारण ती म्हणते पीएसआय झाले हा एक टप्पा होता, तो तिने जिंकला. आता खर काम करायचं आहे, जे अनेक जणींना यशाचा मार्ग दाखवेल

No comments:

Post a Comment