स्वतःची स्तुती आणि मोठेपणा यापासून लांब असणारा माणूस, खरंतर हे लिहणं त्यांना आवडणार नाही, तरीही मला हा मोह आवरत नाही म्हणून लिहतोय. यापूर्वी एकदा त्यांच्याबद्दल लिहलं होतं, " आमचे मास्तर डॉकटर झाले " म्हणून पण आता लिहायला कारण नाही तरीही काही दिवस झाले बऱ्याच लोकांवर लिहायचं हे डोक्यात होतं, फक्त ते उतरत नव्हतं. व्हाट्सएपच्या बोळात उगीच काहीही टायपाव आणि फेकून द्यावं, नाहीतर याच्या त्याच्या लिखानातलं चार शेंड्या माराव्या आणि कॉपी, पेस्टव्या एवढा हा माणूस नक्कीच लहान नाही.
सोलापूर विद्यापिठाच्या युवा महोत्सवाचे अनेक उन्हाळे पावसाळे ज्या कलाकार मुलांनी पाहिले त्या सगळ्या मुलांनी शंकरराव मोहिते - पाटील महाविद्यालयाच्या प्रा. विश्वनाथ आवड यांचं नाव ऐकलं नाही असा एकही विद्यार्थी सापडणार नाही. त्या सगळ्या कलाकार मुलांनी सरांना दिलेलं आदराची उपाधी म्हणजे " मास्तर ". जुन्या काळात हातात दांडकी घेऊन मुलांना बदडणारे, शिस्त म्हणजे शिस्त अशा प्रकारात, शोलेतल्या आसराणीची आठवण व्हावी तस आम्ही जुन्या जमान्यातले मास्तर म्हणून मिरवणारे, आणि त्यांच्या माराच्या आठवणी सांगणारे अनेकजण भेटतील. पण आमचे मास्तर वेगळे आहेत. "आपल्या कॉलेजची मुलं स्पर्धा करतील रे, पण ते केबीपी चं पोरगं तबला छान वाजवत, ते जरा ऐकतो. " " ती छोटी सावळी पोरगी ना ? शास्त्रीय भारी गाते " " का रे, बाबा तू अजून एज बार नाही का झाला " " रोहित्या पुढं कोण पण असू दे तुला सॉलिड बोलायचं आहे" ही वाक्य केवळ सरांच्या तोंडात येतात. समोर कोणत्या कॉलेजचं पोरगं आहे यापेक्षा त्याचे प्लस पॉईंट काय आहेत हे विचारात घेऊन त्याच्या कलेची कदर करणारा बापमाणुस म्हणजे आवड सर. नावात नाथ आहे म्हणून नाही पण, कित्येक कलाकार मुलांचा बापमाणुस आहेत सर.
कॉलेज संपलं की शिक्षक स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करतात, पण घरातला प्रत्येक सदस्य पण कॉलेजचा भाग बनवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी रात्री अपरात्री जागा असणारा आणि त्यांना जेवढं नवीन देता येईल तेवढं देणारे सर आम्हांला जवळचे वाटतात. आयुष्याची वाटचाल शिवाजी महाराजांच्या आदर्शावर करून पी. एच. डी. सुध्दा त्यांच्या अष्ठप्रधान मंडळावर करणारे सर येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.
24 तास कार्यरत असणारे सर, स्वतःसोबत असणाऱ्या इतर माणसांचा पण विचार करतात. कोणत्याही ठिकाणचं अगदी शेवटचा माणूस पण लक्षात ठेवून त्याचं काम कोणतं आणि तो काम करतोय की नाही यावर जाणीवपूर्वक लक्ष असतं. एखादी गोष्ट करायची तर ती पूर्ण नियोजनाने, उंटावरून शेळ्या राखणं कधीच मान्य नसतं. सरांबद्दल कोणाला लिहायला सांगितलं तर तो माणूस नक्कीच त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिलं, मग त्याने खाजगीत त्याने कितीही वेळा सत्कार करून घेतला असेल तरीही. माझं आणि त्यांचं नातं खरंतर शिक्षक आणि विद्यार्थी नाही, पण मी कायम सांगतो आवड सर नावाच्या शिक्षकाचा मी एकमेव एक्सटर्नल विद्यार्थी आहे. त्यांच्या सान्निध्यात न राहता मला खूप शिकता आलं. स्वतःला घडवता आलं, काही वेळ बरोबर राहून हा माणूस मला वाचता आला. विद्यार्थ्यांना राहता यावं यासाठी स्वतःच्या मळ्यात घर बांधून त्यांची सोय करण्याचा विचार करणारा एकमेव प्राध्यापक मी पाहिला. बाकी प्राध्यापक लोकांबद्दल विद्यार्थ्यांची सगळी मतं प्रामाणिक असतात असं नाही. पण सर म्हणजे एकमेव माईलस्टोन आहेत, जिथं मतं, आदर, आणि निष्ठा या प्रामाणिक पणे विद्यार्थी सांगतात. एखाद्या विद्यार्थ्यावर आज ओरडले असतील तर दुसऱ्या दिवशी लक्षातही नसतं. त्याचं मुलाला प्रेमाने जवळ बोलवून घेतील आणि आपण चल हे काम पूर्ण करूयात म्हणतील. ते बिचारं पण कन्फ्युज झालं पाहिजे की आपल्यावर ओरडणारे सर हेच आहेत का ? परवा एक मेसेज पाठवून माझ्यातले दोन चांगले आणि दोन वाईट गुण सांगा, खरं सांगायचं म्हणजे तुमच्याबद्दल आजपर्यंत सगळं चांगलं माहीत आहे त्यामुळे जे वाटलं तेच लिहलं. काम करून घेण्यासाठी किंवा चार पैसे दक्षिणा मिळावी म्हणून भाटगिरी करणारे आम्ही विद्यार्थी नाही. तुम्ही आम्हांला ताठ मानेने उभा केलंत, ते झुकण्यासाठी नाही. तोच ताठा कायम ठेवत आमचे मास्तर खूप मोठे व्हावेत याच त्यांना शुभेच्छा देतो.

No comments:
Post a Comment