आदरणीय साहेब,
सप्रेम नमस्कार,
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या नावाने समृद्ध झाला ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बहुजन समाजाची तीन दैवत फुले, शाहू, आंबेडकर या महान प्रभूतींच्या बरोबर अनेक लोकांनी आपलं योगदान महाराष्ट्र घडवण्यात दिल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जर महाराष्ट्राचा स्वतंत्र इतिहास लिहायचा झाला तर तुम्हांला वगळून लिहला जाऊ शकणार नाही. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, नाईकसाहेब, या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या यादीत तुमचं नाव घ्यावचं लागेल एवढं महत्वाचं काम तुम्ही मुख्यमंत्री असण्याच्या काळात केलं. त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. शेतकरी उभा करण्यासाठी फळबागा आणि जलसिंचन सुविधा उभ्या करण्याचं काम आपण केलंत. माझ्या बाप जाद्यांच्या पिढ्या तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हांला निवडून देत गेल्या. मलाही तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे. महाराष्ट्राच्या लोकनेतृत्व आणि लोकनेत्यात तुमचं नाव आदराने घ्यावे एवढं महान व्यक्तिमत्त्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. बाळासाहेबांनी मराठी मनाला उभारी दिली, त्याचं ग्रामीण महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनाला भुरळ घालण्याचं काम तुम्ही केलं. स्व. विलासराव, स्व. गोपीनाथराव मुंढे साहेब या लोकनेत्यांच्या यादीत आपलं नाव आदराने घेतलं जातं. तुम्ही केलेलं बेरजेच्या राजकारणाची दखल राष्ट्रीय पातळीवर पण घेतली जाते. तुमच्या कार्याला सलाम करता येईल असं कार्य म्हणजे शेताच्या बांधावरून डोक्यावर भाकरी घेऊन जाणाऱ्या कारभारणी, गावगाड्याच्या प्रवाहात आणून त्यांना गावचा कारभार करायला लावलं. बाळासाहेबांनंतर राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे. माझ्या वयाच्या दुप्पट तुमचं राजकारणातील वय आहे. जर नात्याचाच करायचा झाला तर मी तुमच्या नातूच्या वयाचा.
तुमच्या राजकारणाची कृती, राजकीय नेते, विश्लेषक इत्यादी लोक गांभीर्याने घेतात. तुमचं राजकारणा पलिकडचे व्यक्तिमत्त्व आदरणीय आहे, तुम्ही ज्यांच्या मध्ये रमता ते साहित्यिक, कवी, कलावंत, यांना लोकाश्रय मिळण्याची मारामार असताना तुम्ही राजाश्रय दिला. तुम्हांला असलेली साहित्याची जाण, आणि तुमच्या मनात मुरलेले साहित्य यामुळे तुम्ही राजकीय व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाता. तुमची राजकीय मत दखल घ्यावी अशी असतात. माझ्या वयात असतानाच आपण राजकारणात आलात आणि महाराष्ट्राचा सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा पराक्रम आपण केलात. यासाठी राजकीय तोडफोड आपण केलीत, आदरणीय वसंतदादा पाटलांच सरकार आपण पाडलतं, याचा उल्लेख जरी तुम्ही दादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा होत असला तरी, ती तुमची राजकीय गरज असावी हे मान्य करावंच लागेल.
त्यानंतर काँग्रेस सोडणं आणि पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं आणि पुन्हा काँग्रेस सोडणं, असे एन्ट्री, एक्झिट चे प्रयोग जरी तुम्ही केले तरी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचं नेतृत्व तुमच्या हातात दिले होते.
कारण मराठी मनाचं स्वप्न म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अगदी टोकाचे मतभेद असले तरी तुम्हांला पंतप्रधान करायचं म्हटलं तरी गावगाड्यातील लोक एक होतात. हे एक होणं म्हणजे साहेब तुमच्या यशाची, आणि लोकनेतेपणाची खूप मोठी ओळख आहे, पोचपावती आहे.
साहेब खर सांगायचं म्हणजे मला तुमच्या इतिहासात तुम्ही केलेल्या गोष्टींचा आणि पराक्रमाचा आदर आहेच जरूर पण वास्तवात सध्या तुम्ही सत्तेसाठी अगतिक झालेलं नाही पहावत. 2014 च्या निवडणुकीत तुमच्या पक्षाची महाराष्ट्रातील सदस्य संख्या 4 झाली तरी तुम्ही हटला नाहीत. पण 2019 च्या निवडणुकीत सत्ता परत मिळवण्यासाठी आणि तुमची घराणेशाही टिकवण्यासाठी तुम्ही लोकशाहीला दोष देण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया ताई निवडून येणार नाहीत म्हणून लोकांचा लोकशाहिवरचा विश्वास कसा उडेल? या प्रश्नाचं उत्तर देता येतच नाही. राजकीय प्रक्रियेत इव्हीएमचा स्वीकार करताना त्याच्या फायद्या तोट्याचा खूप मोठा विचार आणि अभ्यास करून निवडणूक आयोगाने ती पद्धत देशात आणली. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत त्याच यंत्रावर आपण निवडून आलात, मात्र देशात सत्तापरिवर्तन झाल्यावर त्याचं मशीनवर आपण संशय घेण्यात आघाडीवर आलात. निवडणूक आयोगाने दिलेल मशीन हॅकिंगचं आव्हान एकही राजकीय पक्ष स्वीकारू शकला नाही. तरीपण निवडणूक आयोगावर तुमचा आणि तथाकथित बुद्धीवाद्यांचा विश्वास नाही, याचा अर्थ तुम्ही निवडून आलात तर देशात लोकशाही आहे आणि नाही आलात तर नाही, म्हणजे सरळपणे तुमचा या देशातल्या लोकांवर आणि लोकशाहीवर विश्वास नाही. साहेब तुमच्या बोलण्यातुन तुमचा आत्मविश्वास कमी झालेला दिसतोचं, पण तुमची विश्वासार्हता कमी होतेय हे समोर येतंय. मोदींना राफेल मध्ये क्लीनचिट देऊन, नंतर यु टर्न घेताना तुमची झालेली तारांबळ पाहिली आहे. आतातर तुम्ही ज्योतिषाप्रमाणे कोणतं सरकार किती दिवस टिकेल आणि कोण येईल याची भविष्यवाणी करता हे बघून वाईट वाटतं. साध्या पगडीच्या प्रकरणात तुम्ही लोकांच्या डोक्यावर टोप्या कशा ठेवल्या हे चांगलंच कळालं.
साहेब निकाल काहीही येतील, पण तुमचं भरकटत जाणार बोलणं ऐकून तुमची अगतिकता समोर येतेय. सेनेतुन नारायण राणे बाहेर पडले तेव्हा सेना संपली वगैरे बरंच काही झालं पण, सेना संपली नाही. तुमच्यासारख्या आदरणीय माणसाने पक्षाचा दोन निवडणुकीत पराभव झाला म्हणून लोकांवर आणि लोकशाहीवरचा विश्वास कमी करणं हे तुमच्या पक्षासाठी आणि तुमच्यासाठी पण घातक आहे हे ओळखा. स्वतःच घर जळत असताना, दुसऱ्याच्या घरावर पाणी मारणाऱ्या शेखचिल्ली सारखी अवस्था नका करून घेऊ. तुमची महाराष्ट्राला गरज आहे.
घरात वय झालेल्या आजोबांना बाकी लोक काहीबाही बोलत असताना घरातला नातू प्रेमापोटी त्यांची बाजू घेतो तसंच काहीसं समजा. वय झालेल्या आजोबांना रस्ता ओलांडता येत नाही तेव्हा काठी हातात घेऊन रस्ता पार करून देणारा रस्त्यातला एखादा तरुण समजा, पण साहेब तुमच्या बोलण्याने आणि अगतिकतेने तुमचा सूर्य अस्ताला जातोय. तो सूर्य वाचवा एवढीच एक अपेक्षा.
No comments:
Post a Comment