Thursday, 16 May 2019

वंचित आघाडी - किंगमेकर, गेमचेंजर कि गेममेकर...

सध्या महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात ज्यांची दखल घ्यावीच लागेल अशी दोन माणसं आहेत, एक म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम चे अकबरुद्दीन ओवेसी ही दोन माणसं. या दोन्ही माणसांचं वैशिष्ट्य म्हणजे दोघेही बॅरिस्टर, उच्चशिक्षित यांच्याबाबत कोणता किंतु बाळगण्याचं कारण अजिबात नाही, आणि पूर्वग्रह तर अजिबात नाही.
ओवेसींबद्दल एकच कि, त्यांचा उदय झाला कसा ? आजपर्यंत अल्पसंख्याक म्हणून ज्या लोकांचा वापर देशात काँग्रेस आणि तथाकथित सेक्युलर लोकांनी करून घेतला त्या लोकांना मुस्लिम लोकांच प्रतिनिधित्व करू द्यायचं नाही. इथूनपुढे देशातल्या तमाम बुद्धीवादी, सेक्युलर लोकांनी मुस्लिम समाजाचं अल्पसंख्याक म्हणून जे खेळणं करून ठेवलंय त्यांना या समाजाचा वापर करू द्यायचा नाही हा उद्देश ठेऊन त्यांचा प्रवास झाला असावा. कदाचित यांच्या वळचणीला राहून जे ओंजळीत मिळतंय त्यापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर आपला समाज आणि भाईबंद एक करण्याचा मोठा प्रयत्न ओवेसी यांनी केला आहे.
दुसरे म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर, बाबासाहेबांचे नातू म्हणून महाराष्ट्रातील दलित समाजात त्यांच्या शब्दाला मान आहेच, पण दलित नेतृत्व म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केलेलं आहे. रिपब्लिकनची किती आणि कशी शकलं झाली यापेक्षा तो समाज एकत्र कसा येऊ दिला नाही याचा सुज्ञ विचार दलित समाजातल्या कोणत्याही नेत्याने आजतागायत केलेला नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईपेक्षा प्रकाश आंबेडकरांचा पिंड वेगळा आहे. त्यांचं संघटन बांधून ठेवण्याचं कसब पण वेगळं आहे. पण सत्तेच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आघाडी म्हणून जाणीवपूर्वक सत्ताकारणाच्या वर्तुळाबाहेर ठेवण्याचं काम, तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आणि त्यांच्या युतीने केलं. देशात गांधी नेहरू कुटुंबियांच्या त्यागाच्या चर्चा होतात, म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा हक्क देशाच्या पंतप्रधान पदावर असावा हे ठीक आहे ? जर त्यांच्या त्यागाची किंमत पंतप्रधान पद असेल तर, आंबेडकरांच्या वारसाला साधं मंत्रिपद देण्याचं धाडस काँग्रेस आणि आघाडीने कधीही दाखवलं नाही, कि आंबेडकरांची साधी दखल घेतली नाही.
गेल्या 70 वर्षात आंबेडकरांनंतर दलित समाज संघटित न होऊ देण्याचं पाप कोणाचं? याचं उत्तर कुठल्यातरी मंडळाचं सदस्यपद, राज्याचं राज्यपाल पद भूषवणारे तथाकथित, काँग्रेसच्या मर्जीवर निवडून येणारे दलित नेते कधीच देणार नाहीत, कारण त्यांच्या बुडाखालची सत्तेची उब त्यांना याचं उत्तर देऊ देणार नाही.
प्रकाश आंबेडकरांनी 2009 च्या निवडणुकीत रिडालोसचा प्रयोग केला, पण प्रयोगाच्या पहिल्या अंकानंतरच नाटकातली निम्मी पात्रं पळून गेली, त्यावेळी आंबेडकरांची दखल कोणीच घेतली नाही. फक्त सत्तेचा मुकुट डोक्यावर चढावा म्हणून रिडालोसचा भाग झालेले बाजारबुणगे, पद मिळाल्यावर पसार झाले. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी आंबेडकरांनी नवा प्रयोग, नवी आघाडी आणि नवा विचार मांडला. ज्यांना जाणीवपूर्वक सत्तेच्या चक्रातून आजपर्यंत बाहेर ठेवलं गेलं, ते मुस्लिम, दलित, आणि धनगर कि धनगड हा शाब्दिक खेळ खेळत ज्यांना सत्तेच्या खेळातुन कायम बाहेर ठेवलं होतं. असे खेळाडु जुळवण्याचं काम आंबेडकर आणि ओवेसी यांनी केलं. जात आणि धर्म यापेक्षा सत्तेचे वंचित एकत्र करण्याचं काम या दोघांनी केलं. यांची दखल का घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या गावगाड्यात आजपर्यंत ज्यांनी धर्मनिरपेक्ष म्हणून काँग्रेसच्या झोळीत भरभरून मत टाकली ती माणसं सत्तेपासून तर वंचित होतीच, पण ज्यांना काही पैसे दिले तर त्यांचं भागत, किंवा दारूच्या बाटल्या आणि मटण चारलं की सत्तेची चिकन बिर्याणी सहज खाता येते असा समज गावोगावच्या वतनदारांनी करून घेतला होता. अशा माणसांना जागृत करण्याचं काम वंचित आघाडीने केलं आहे.
वंचित आघाडीची दखल ही घ्यावीच लागेल, कारण गावागावात असणाऱ्या दलित लोकांनी यावेळेस ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे त्याठिकाणी पैसे न घेता, प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे प्रचारासाठी देऊन आघाडीचा प्रचार केला. ज्यांना पैसे देऊन विकत घेतलं जातं होते, दलित म्हणजे आमची हक्काची व्होटबँक, असं म्हटलं जातं होतं, त्या समाजाने कुणाची लाचारी न पत्करता, दारूच्या बाटलीला, हाडकाच्या आमिषाला बळी न पडता, एकजुटीने मतदान केलं. प्रत्येक मतदारसंघात प्रकाश आंबेडकर उभा राहिलेत हा विचार करून मदत केली.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांत दरवर्षी आंबेडकर जयंतीला कर्ज काढून जयंती साजरी करणाऱ्या लोकांनी यावेळेस जयंती साजरी न करता, आंबेडकरांच्या विजयानंतर जयंती मोठी साजरी करू हा विचार करुन आंबेडकरांना मदत केली. प्रचार केला, मतदान केलं. दलित, वंचित समाज एक झाला हा बाबासाहेबांचा आणि प्रकाश आंबेडकरांचा विजय आहे. निवडणुकीत हारजित हा भाग बाजूला ठेवला तर, जो समाज आजपर्यंत एक होण्यासाठी प्रयत्न करून एक होत नव्हता तो सगळा समाज एक करण्याचं काम आघाडीने केलं आहे.
मतदान झालं, निकाल येतील, पुढं काय? आघाडीचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल ? हे सगळं निकालानंतर बाहेर येईलचं पण सगळ्यांत महत्वाचा प्रश्न हा आहे कि, वंचित आघाडी- किंगमेकर, चेंजमेकर कि गेममेकर? 
मतदान आणि महाराष्ट्राचं खरं चित्र बघितलं तर आघाडी सध्या किंगमेकर होऊ शकत नाही, पण जर भाजपाला बहुमत मिळत नसेल तर पंतप्रधान पदासाठी मायावतींना पाठिंबा देऊन आंबेडकरांनी किंगमेकर होण्याची भूमिका घेतली आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या  वेळी वंचित बहुजन आघाडीला  रोखायलाचं हवं, देशाच्या सत्ताकारणात आघाडी वंचित राहील आणि किंगमेकर पण ठरणार नाही पण राज्याच्या राजकारणात मात्र आघाडी नक्की किंगमेकर ठरेल.
दुसरा प्रश्न कि आघाडी चेंजमेकर ठरेल का? तर सध्या अस्तित्वात असणार सरकार आणि पुन्हा नवीन येणार सरकार बदलणार नाही हेच चिन्ह आहे त्यावेळी चेंजमेकर होणं पण धूसर आहे.
राहता राहिला प्रश्न गेममेकरचा, तर वंचित आघाडी महाराष्ट्र लोकसभेच्या जागांपूर्ती तरी गेममेकर ठरताना दिसतेय, कारण आजपर्यंत सत्तेचा सोपान गाठण्यासाठी काँगेस आणि त्यांच्या आघाडीने दलित मतांच्या जोरावर सत्ता मिळवली मात्र या सत्तावंचितांना सत्ता देताना सत्तेत वाटा न देण्याचा जो गेम केला त्यांचा गेम मात्र वंचित आघाडी वाजवू शकते हे नक्की. म्हणजे इथं आघाडी नक्कीच गेममेकर आहे. पण वंचित आघाडी महाराष्ट्रापुरती गेममेकर ठरत नाही, तर त्याचा परिणाम हा देशाच्या सत्ताकारणावरती होऊ शकतो. जर उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या तर, त्यांना महाराष्ट्रात जागा कमी होऊन चालत नाही. शेतकरी, बेरोजगार यांच्याबरोबर यावर्षी भाजपाला धनगर समाजाच्या नाराजीचा सामना करावा लागला असता. जी मत नक्कीच काँगेसच्या झोळीत गेली असती, ती मत त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या पक्षाला गेली. वंचित आघाडी ही दलित वंचित लोकांना त्यांचे प्रश्न मांडणारी यापेक्षा त्यांची दखल घेणारी आघाडी वाटली, याचा परिणाम मोठा होऊ शकतो.
महाराष्ट्रात काही जागा भाजपाच्या कमी होतील पण खूप मोठा फटका बसणार नाही. पण जिथं काँगेसची माणसं नक्की निवडून येतील किंवा आली असती अशा काही जागा वंचित आघाडीने घेतलेल्या मतांनी काँगेसच्या हातातून नक्की जाऊ शकतात. सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, सांगली इ जागांचा फटका काँगेस आघाडीला बसू शकतो. यामागे काँगेसच्या नेतृत्वाला प्रकाश आंबेडकरांची न कळलेली किंमत आहे. वंचित आघाडीने महाराष्ट्रात भाजपा आणि युतीच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे सत्तेच्या मैदानात युतीचा मार्ग पण सोपा होतोय.
कदाचित काँगेसला सगळ्या पक्षांची मोट बांधता नसेल आली पण जागांचा विचार करता दुसरं मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांशी चर्चेचा गेम खेळून, काँगेस आघाडीने स्वतःचा गेम करून घेतला. आंबेडकरांनी काळाची पावलं ओळखत स्वतःचा गेम होऊ न देता, येणाऱ्या काळात वाटचाल केली तर आंबेडकर नक्की काँगेस साठी गेममेकर झालेले असतील. शेवटी सध्यातरी आंबेडकर लोकसभा निवडणुकांचा विचार करता काँगेस आघाडीसाठी सत्तेतून बाहेर ठेवणारे गेममेकरचं ठरतील.

No comments:

Post a Comment