Monday, 26 August 2019

ट्रोजन हॉर्स, महाभरती आणि युती

प्राचीन ग्रीक साहित्यात वर्जिन द्वारा रचित लॅटिन भाषेतील एक महाकाव्य द एनिड मध्ये, ग्रीक सैन्याने ट्राय साम्राज्य जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नात 10 वर्ष वाया घालवली, तरीही ते जिंकू शकले नाहीत. पराभव मान्य करतील ते ग्रीक कसले. त्यांनी ट्राय साम्राज्यातील एका अंधश्रद्धेचा फायदा उचलायचे ठरवले. ट्राय लोकांना घोडा पवित्र होता, ग्रीकांनी तीन दिवसात लाकडाचा घोडा तयार केला आणि ट्राय नगराच्या प्रवेशद्वारासमोर नेऊन उभा केला. हार मान्य करून ग्रीक लोक युद्धाच्या मैदानातून निघून गेले. ट्राय लोकांना प्रवेश दारासमोर उभा असणारा घोडा ग्रीकांनी दिलेली भेट समजून ट्राय लोकांनी नगरात घेतला. इथंच घात झाला ग्रीकांनी त्या लाकडी घोड्याच्या पोटात स्वतःचे कुशल 30 सैनिक बसवले होते त्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडून ट्राय नगराचे दरवाजे उघडून आपले ग्रीक सैन्य आत घेतले, आणि ट्रायवर विजय मिळवला. ग्रीक कथांत ही कथा ट्रोजन हॉर्स म्हणून ओळखली जाते. ही लोककथा म्हणून प्रसिद्ध असेल किंवा सत्यकथा असेल पण आजच्या घडीला त्याचा संदर्भ विचारात घ्यावा लागेलच.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या पक्षात सुरु असणारी तथाकथित महाभरती पण ट्रोजन हॉर्सचा प्रकार असावा. हे ओळखणं युतीला जड जातं आहे असं म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात सुरू झालेल इन्कमिंग आश्चर्यकारक आहे. गावोगावचे सरदार स्वतःच्या वतनदाऱ्या बिनबोभाट युतीच्या पदरात आणून टाकत आहेत. सत्ताधारी पक्षात राहिल्याने मतदारसंघात विकास होतो असं गोंडस कारण देऊन प्रत्येक मतदारसंघातील सरदार पवार साहेबांच्या भाषेत पेशव्यांच्या दरबारात आमदारकीची वस्त्र परिधान करण्यासाठी डेरेदाखल होत आहेत. वस्त्र आपली, माणसं आपली, जागा आपली, आणि वतनपण आपली. फक्त नावापुढे गेलेले कोणतं तरी तथाकथित नामदारपद लावण्यासाठी ही मंडळी एकाच्या पुढे एक पळत आहेत. यांचं पळणं कितपत खरं मानावं हाही एक प्रश्न आहे. जर यांना मतदारसंघात विकास करायचाच होता तर 1999 पासून ते 2014 पर्यंत राज्यात यांचीच सत्ता असून विकास का झाला नाही? विकास लंगडा, पांगळा, की   आंधळा झाला होता की, यांच्या मग्रुरीने जनतेपर्यंत पोहचला नाही. 15 वर्ष सत्तेच्या सावलीत राहून जर मतदारसंघात विकासाच्या योजना हे आमदार राबवू शकले नसतील तर आता सत्तेच्या दारात जाऊन हे कोणता विकास राबवणार आहेत? यांचा पराभव जनतेने केला पाहिजे, यांची जागा जनतेने दाखवून दिली पाहिजे, या आमदारांना असा कोणता माज आहे की स्वतःच्या नावापुढे पर्मनंट आमदार अशा बिरुद हे लोक लावतात. बर यांचं कर्तृत्व काय? हा प्रश्न पण विचारात घ्यावा लागेलच, केवळ निवडून येणं हाच निकष पक्षात प्रवेश देण्यासाठी लावला जात असेल तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सावध व्हायला हवं. हे तुमचा पक्ष वाढवायला नव्हे तर बुडवायला आलेले ट्रोजन हॉर्स आहेत. ज्यांनी अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी बुडवली ते हेच लोक आहेत जे उद्या सेना, भाजपाला बुडवतील. दोन्ही पक्ष बुडताना हेच उंदीर सर्वात पुढे असतील, जे जहाज बुडताना वाचवायला येणार नाहीत. याची दुसरी बाजुपण दोन्ही सत्ताधारी पक्षांनी विचारात घ्यायला हवी, पक्ष सोडणाराची संख्या राष्ट्रवादीतुन सर्वात जास्त आहे, याचा अर्थ हा पण असू शकतो की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी हे ट्रोजन हॉर्स तर पाठवले नसतील? तस बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणात साहेबांचा हात कोणी धरणार नाही. त्यांच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते, जुन्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामावेळी एक झाड आडवं येत होतं. ते तोडायला दिल्ली महानगरपालिका परवानगी देत नव्हती. अशावेळी अधिकाऱ्यांना त्याच्या भोवती पार बांधायला लावून, झाड आपोआप वाळलं की तोडायला लावायचा अप्रत्यक्ष सल्ला पवारांनी दिला होता. आता त्यांचा पक्ष वठत असताना, त्यांच्या बुडातील दगड भाजपच्या झाडाखाली पारासाठी वापरून भाजपचे झाड वाळवण्याचा प्रयोग पवार साहेब कधीही करू शकतात.
सध्या राष्ट्रवादीचे ट्रोजन भाजप आणि सेनेत घुसताहेत हे नक्कीच युतीला सत्तेच्या खाली खेचतील.
महाभरतीचा हा प्रयोग सत्तेच्या महाभारताचा प्रयोग ठरू नये. स्वतःच्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर कोणताही पक्ष उभा राहतो. आयारामांच्या या गर्दीत भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी निष्ठावान आणि हाडाचा कार्यकर्ता म्हणूनच उभा राहायचं का? पाच पांडवांना जगण्यासाठी पाच गाव हवी होती, त्यासाठी महाभारत घडलं.  सत्तेची ऊब पाच वर्ष बुडाखाली राहावी म्हणून निष्ठा बाजारात विकणारे नेते कोणत्याही पक्षात जातील तोपर्यंत सत्तेच्या उदय आणि अस्ताचा खेळ सुरूच राहील. पांडव जिंकतील, कौरव जिंकतील, आयाराम, गयारामांच्या खेळात दर 5 वर्षाला लोकशाही मात्र हरत राहील....
भारतीय लोकशाहीचा विजय असो....

No comments:

Post a Comment