Saturday, 31 August 2019

प्रोफाईल नेम:- वसीम शेख बार्शीकर

उस्मानाबादच्या व्यंकटराव महाजन कॉलेजच्या राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेची रात्र आणि त्याच रात्री मैफल बसलेली. मैफिलीत काय बोलायचं म्हणून सतिश देशपांडेंनी कोणाचा तरी पुतळा उभा करू आणि त्यासाठी कोणी काय भाषण करेल ते करायचं. ज्याचा पुतळा उभा करायचा तो माणूस निवडला गेला. वसीम मलंग शेख.... मुक्काम पोस्ट बार्शीकर.   लोकांना बार्शी भंगवंतांची म्हणून माहीत, पण आम्हा सर्वांना बार्शी म्हटली की वसीम भाई आठवायचे. त्यांच्या न उभा केलेल्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात कोण कसं बोलेल याची रंगीत तालीम तर झाली,पण भाई खरं सांगू. तुमच्या जाण्याने महाराष्ट्र गाजवणाऱ्या सगळ्या शब्दांच्या साधकांशी शब्दांनी आज गद्दारी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रमोद खांडेकरच्या जाण्याने त्याच्या exit वर लिहताना काही नियम सांगितले होते, पण भाई तुम्ही बोलला ते खरं करून दाखवलं, नवा मी नियमांचा यम आहे. असले नियम तोडायला नको होते राव. अगदी परवा लिहलेली पोस्ट,
मला काहीच टेन्शन नाही....
कधी कधी याचंच टेन्शन येत... असे म्हणणारे भाई खूप हसलो. दुपारी उस्मानाबादहुन प्रशांत  बापूंचा फोन आला, नवा बार्शीत आपलं कोणी जवळचं आहे का? उत्तर होते - आपले वसीम भाई आहेत ना. पण उत्तर संपेपर्यंत बापूंनी सांगितलं तो तर नाही ना जगात. जवळची खूप माणसं गेली तेव्हा काही वाटलं नव्हतं, पण आज खूप वाईट वाटलं. उमेश फोनवर बोलताना म्हणत होता, नव्या खूप वेळा आत्महत्या करावी वाटली, पण भाईच्या पोस्ट वाचून जिवंत आहे.
तुमच्या exit वर खूप जण बोलताहेत पण मुक्या शब्दांच दुःख मुक्या शब्दांनाच माहीत.
भाई खरं सांगू आयुष्यात सगळ्यात जास्त चेष्टा तुमची केली. आयुष्यात कधी तुमची बॉडी बिल्ड नाही झाली, पण कोणीतरी दुसरा वसीम शेख शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकत होता आणि त्याच क्रेडिट मी तुमच्या नावावर खपवून टाकलं, आणि त्याचा आनंद पण तुम्ही घेतला.
तुमच्या आठवणी सगळेजण सांगत राहतील, बोलत राहतील, तुम्हांला आठवत राहतील पण भाई तुम्हांला कोणी पुसून टाकू शकणार नाही.
पाठीमागे मला भावलेली माणसं असं सदर लिहताना पहिला मान तुम्हांला दिला होता, मी गमावलेली माणसं यात कोणता नंबर द्यावा. आयुष्यात भाई तुम्ही स्पर्धक कधी नव्हता, तुम्ही जिंकल्याचा आनंद खूप व्हायचा. आज असली कोणती स्पर्धा तुम्ही जिंकलीत. बेल वाजली की थांबायचं हा नियम माहीत असणारा माणूस..
भाई बेल वाजली नव्हती,
भाषण आटोपतं घ्यायचं असतं....
जिंदगी नव्हती..
खुणा करून भाषण थांबवायचं हे ठरवायचो आपण...
आज ओरडून पण तुम्हांला पण थांबवू शकत नाही...
स्वतःला थांबवेन...
तुम्हांला कसं थांबवेन...
जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला...
असं म्हणतात,
पण साला देव पण एवढा भिकारी असेल असं वाटलं नव्हतं,
साध्या माणसाला जवळ घेऊन त्याला काय आनंद मिळणार आहे....
सोलापूर जिल्हा बार्शीवर अन्याय करतो म्हणून बार्शीला उस्मानाबाद जिल्ह्यात घाला अशी मागणी करणारा द्रष्टा कार्यकर्ता होता भाई तुम्ही, बार्शीला मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणतात म्हणून बार्शी मराठवाड्यात पाहिजे, असं सांगणारे तुम्ही तुमच्या म्हणण्याचं समर्थन करताना म्हणायचा, नवा प्रवेशद्वार कुठं घराच्या बाहेर असतं का? तुम्ही विचार अफलातून करायचा राव, घरी येऊन जेवण न करता गेलेला पहिला माणूस म्हणजे तुम्ही. खंत कोणत्याच शब्दांत व्यक्त करू शकत नाही, म्हणून जरी जगातून तुम्ही exit घेतली असेल. पण मनात कायम जिवंत असाल म्हणून तुम्हांला श्रद्धांजली नाही वाहणार

No comments:

Post a Comment