आज महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करतोय. मोहनदास करमदास गांधी नावाचा सर्वसामान्य माणूस ते जगाला अहिंसेचा संदेश देणारा महात्मा. हा प्रवास खूप मोठा आहे. बापूंच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगानी बापू जगातल्या प्रत्येक प्रॉब्लमचं सोल्यूशन आहे हे आम्हांला आणि जगाला कळालं पण बापूंचा वापर, जगानं त्यांच्या सोयीने करून घेतला. गांधी नोटेवर चालतात, पण थुंकी लावलेल्या बोटासारखं, बापूंना जवळ ठेवता येतं आणि दुरही सारता येतं. बापूंचा वापर कोठे, कसा, आणि केव्हा करायचा तसा केला गेला पण बापूंनी कधीही तक्रार केली नाही की, त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून कधी कोणता निषेध मोर्चा निघाला नाही. गांधीवादी पण बिचारे त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बापूंची काठी हातात घेऊन उभा असलेल्या पुतळ्यापासून ते आता सरकारी कोनाड्यात टाकलेल्या फोटोपर्यंत त्यांची विटंबना झाली तरी कोणाला तक्रार नाही. पण बापूंनी पाहिलेल्या भारताच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवताना बापूंच्या अनुयायांन पासून ते बापूंच्या विरोधकांपर्यंत बापूंची गरज प्रत्येक माणसाला लागली. पुतळा, फोटो, ते आता चष्म्याच्या सिम्बॉलपर्यंत बापू आणून पोहचवले तरी बापू नावाचा महात्मा भारतापासून वेगळा करता येत नाही.
पण बापू तुम्ही दिलेल्या मार्गाने आता चालावं लागेल. देश स्वच्छ करता करता, सामाजिक घाण होतेय याचं भान मला आहेच. देशातली शौचालयाची स्थिती किती टक्क्यांनी वाढली, हे महत्त्वाचं आहेच त्याचा आनंद आहेच. पण ज्यांचं जिणं दलदलीत आहे त्यांचं काय? अल्पसंख्याक आणि दलितांवर हल्ले होत असताना आणि सामाजिक स्वास्थ अस्वच्छ होताना प्रधानसेवक ''मौन की बात" करतात हे अनपेक्षित आहे.
देशात मी मांडलेला विचार सर्वश्रेष्ठ आणि त्याला विरोध करणारा देशद्रोही होणार असेल तर कशी डाल डालपर सोने की चिडीया गाणार? साहित्यिक,विचारवंत, बुद्धीवादी, चित्रकार, पत्रकार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अगदी विध्यार्थी पण बोललेलं सरकारला चालत नसेल तर तुम्हांला अभिप्रेत असणारी लोकशाही कुठं आहे. मला न खरंच आता तुमचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या, आणि तुमच्या नावाचा विरोध करणाऱ्या प्रत्येक लोकांच्या कृतीचा कंटाळा येऊ लागला आहे. जगाला महान विचारांचा संदेश देणाऱ्या देशात 5 वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार आणि प्रधानसेवक जर फक्त निवडणुकीचंच वातावरण ठेवत असतील तर, त्यांनी बदलायला हवं. प्रधानसेवक हा निवडणुकांच नेतृत्व करण्यासाठी नाही तर, लोकांच्या सेवेसाठी दिलेला सेवक आहे याची जाणीव करून द्यायला हवी. बस्स झालं 60 वर्षाच्या कामगिरीला आम्ही तुम्ही 60 महिने दिलेल्या शिव्या ऐकून घेतल्या ना? आता कामाचं बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 दिवस निवडणुकीच्या माहोलात पोरांना रोजगार मिळेल. पण नंतर काय, तुमचं ''मेक इन इंडिया" करताना, साधी जनावरांची मेक आमच्या गावात तयार होऊ शकली नाही . कशाचा आलाय, मेक इन इंडिया. न सुरू झालेल्या स्टार्टअपच्या अपयशाच्या कहाण्या ऐकण्यासाठी कुठं आहे प्रधानसेवकांकडे वेळ. मुद्रा लोनची मुद्रा कोणत्याही ठिकाणी उतरू शकली नाही, सुशिक्षित बेरोजगार नावाची मुद्रा मात्र प्रत्येक पोराच्या कपाळावर आहे. त्याला भजी, पकोडे तळायला लावायची तुमची स्कीम पण आमच्यापर्यंत पोहचू नाही शकली.
शेतकरी, कष्टकरी मरत असताना देशातील सरकार, अधिकारी आणि प्रशासन यांना काही वाटत नाही, डोळ्यावर झापडं ओढून, गेंड्याची कातडी पांघरलेल्या निष्ठुर सरकारचे निकष आणि अभ्यास कधी संपणार याची वाट बघण्याचं धैर्य माझ्यात नाही. स्वतःच घर जळत असताना घरावर पाणी न टाकण्याइतका मी वेडा नाही. आज घर जळतंय. उद्या देश जळेल, त्यावेळी देश जाळणाऱ्याच्या यादीत माझही नाव असायला पाहिजे, कारण स्वतःच घर जळताना मी बघत बसण्याचा मूर्खपणा मी केलेला असेल.
क्रांतिवीर मधला नाना पाटेकर मी किती दिवस आठवायचा, आणि किती दिवस कोणतीतरी कलमवाली बाई मला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला येईल याची वाट बघायची. मी मिसळपाव खाताना समाजाची उसळ होतेय याची जाणीव मला आहे. मी विवेकी आहे म्हणून कदाचित त्यांचं टार्गेट मी निश्चित असणार आहे, पण अगोदर माझ्याबाजूचा माहोल भयभीत करत असताना आणि भयभीत लोकांना आधाराची गरज असताना मी केवळ उसळपाव खात बसण्याची आणि लहान मुलाला त्याच्या हातात दगड देण्याचा प्रयत्न मी करणार नाही. मी मारायला सांगितलेला दगड समाज्यातल्या कोणत्याही चुडेलचं डोकं फोडायच्या उपयोगाचा ठरायला नको आहे. डोकी ताळ्यावर आणणारा विचार पाहिजे. तुमची काठी हातात घेऊन मला लोकांची डोकी भडकवता नाहीत येणार, भडकणाऱ्या डोक्यात सुज्ञ विचार आला पाहिजे. बलात्काराचं समर्थन करणारा आमदार पक्षात असताना पक्षप्रमुख आणि प्रधानसेवक हे कसले कुटुंब प्रमुख आणि देशप्रमुख. यांनी सोयीस्कररित्या याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मूक समर्थनच नाही का? मॉब लिचिंग, दलितांवर हल्ले, अल्पसंख्यात असणारी भीती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीची समस्या, याच्याऐवजी पाकिस्तान, टोकाचा राष्ट्रवाद या धोरणावर देशातील सगळे प्रश्न संपले असं नाही. टोकाच्या राष्ट्रवादाने समाज सुरक्षित राहत नसतो. कोणताही वाद निर्माण करताना त्याच्या तळाशी असणारा भुकवाद संपला पाहिजे. उपाशी पोटाला राष्ट्रवादाचा डोस देणं कितपत फायद्याचे आहे. एक प्रश्न सोडवा जरूर पण मूळ प्रश्नाला बगल देता कामा नये. गांधीजींची जयंती साजरी करताना रस्ते, शहरे स्वच्छ करणं चांगलं आहेच पण आपल्या अंतकरणाचा रस्ता पहिला स्वच्छ करा. तुमच्या वैकासिक गोष्टीचं मला कौतुक आहे, तुम्ही घेतलेल्या ध्यासाच पण कौतुक आहे. आता काम करण्याची वेळ आली आहे, त्यावेळी फक्त गप्पा मारून काम होतील असं नाही. तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. साहेब लोकसभेच्या जोडीला, राज्यसभेत बहुमत असताना बाह्यसत्ता आणि सत्ताबाह्य केंद्रांनी तुमची सत्ता चालवण्या इतपत तुम्ही कमकुवत निश्चित नाही. बापूंच्या छातीच्या बरगड्या दिसत होत्या, पण छातीचं मोजमाप माहीत नसलेल्या त्या महात्म्याने परकीय सत्ता पालथ्या घातल्या. तुमची मांसल छाती आणि तीच मोजमाप माहीत आहे, छातीत आणि मनगटात असलेल्या ताकदीचा कधी उल्लेख पहिलवानाने करायचा नसतो, हे विसरलात तुम्ही. तथाकथित चार टाळक्यांनी आपला उल्लेख राष्ट्रपिता असा केला, खरंच घरात दुहीची बीज पेरून आपण राष्ट्रपिता व्हाल असं वाटत का? मला देशात
समाज म्हटलं की दोन बाजू येणारचं पण भारताची प्राचीन ओळख ही सहिष्णु आहे ती ओळखा, एक विचार मान्य नसेल म्हणून तो संपवायला जाणं ही सहिष्णुता नाही, आणि ही ओळख कधीही संपवता येणार नाही. देशातल्या दुसऱ्या पक्षाच मी समर्थन नाही करणार कारण त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता मला मान्य नाही. खूप वर्षांनी तुमच्या हातात बहुमत आहे, बहुमताचा वापर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केला तर तुमचं नाव इतिहासात लिहल जाईल पण इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इतिहास नक्की पुसून टाकेल. बापूंच्या जयंतीचा मुहूर्त मी साधला याच्या पाठीमागचं कारणपण तसच आहे. तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेत उत्तर दिलं तर माझी ताकद कमी पडेल, त्यामुळे मौनाच्या भाषेत हे उत्तर द्यावं लागेल. हा कोणा बुद्धिवाद्याचा, लेखकाचा, प्रसिद्ध माणसाचा आवाज नाही. तो देशातल्या हजारो बेरोजगारो तरुणांचा आवाज आहे. तो विवेकाचा आवाज समजा. माझा आवाज विवेकाचा आहे. हा आवाज एकटा असेल, क्षीण असेल, पण त्याचा एक हुंकार व्यवस्था बदलाचा आक्रोश ठरू शकेल. या आवाजाला तुम्ही बंद करू शकाल, पण संपवू शकणार नाही. कोणत्याही गोळीवर नाव येण्याइतका मी मोठा नाही, पण माझा आवाज हजारो ह्रदयाचा हुंकार व्हावा. बापूंच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम
सदर ब्लॉगवर मांडलेली मत ही माझी वैयक्तिक असून, त्यामध्ये कोणाला त्रास देण्याचा, टिका करण्याचा कोणताही हेतू नाही. जर तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ब्लॉगवर व्यक्त केलेली मतं ही माझी असून ती कोणीही स्वतःची मत म्हणून कॉपी पेस्ट करु नयेत
Tuesday, 1 October 2019
मी आवाज विवेकाचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment