Saturday, 19 October 2019

पवार साहेब मॅन ऑफ द मॅच होतील का?

दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी अख्खा सातारा लोटला होता, व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांसह अनेक मान्यवर होते. महाराज भाजपात जाणार अशा वावड्या उडत होत्या, मुख्यमंत्री शुभेच्छा देताना, साताऱ्याच्या भोवती हरभरा खूप पिकला की काय अशी शंका मनात आली. मुख्यमंत्र्यांची जबरदस्त बॅटिंग झाली, भाषण संपलं, महाराज आजच भाजपा प्रवेशाची घोषणा करतील काय असं वाटतं होतं. त्यावेळी क्रिकेटच्या मैदानात धोनी जसा फिनिशर म्हणून शांतपणे येतो बॅटिंग करतो आणि मॅच जिंकून देतो तसेच पवार साहेब बोलण्यासाठी आले, आजपर्यंत टिव्हीच्या पडद्यावर ज्यांची भाषण ऐकली होती  त्यातल्या बऱ्याच लोकांची भाषण समोर बसून ऐकत होतो, राजकारणातल्या अनेक उन्हाळे पावसाळे ज्यांनी पाहिले असे पवार साहेब उभा राहिले. शुभेच्छा देऊन झाल्या पण साहेबांच्या भाषणात एक वाक्य महत्वाचं होतं, व्यासपीठावर सगळे बसले आहेत, आणि राजमाता कल्पनाराजे मात्र रयतेत, जनतेत बसल्या आहेत. व्यासपीठावरच्या आणि समोरच्या समुदायाला जाणीव करून दिली की, जोपर्यंत राजमाता बोलत नाहीत तोपर्यंत महाराज पक्षात राहतील. मुख्यमंत्र्यांची बॅटिंग झाली पण मैदान पवार साहेबांनी मैदान आणि मॅच जिंकली.
   लोकसभेच्या निवडणूकामध्ये महाराज पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार, उमेदवारीला राष्ट्रवादीच्या शिलेदारांचा विरोध, एकाही राष्ट्रवादीच्या आमदाराने पक्षाच्या उमेदवाराचा मनापासून प्रचार केला नाही, आणि तरीपण उदयनराजे 70000 मताधिकक्याने निवडून आले, ही मतं राष्ट्रवादीची होती? पवार साहेबांचा करिष्मा होता? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही हीच आहेत.
महाराजांच्या वैयक्तीक करिष्म्यावर ही मतं महाराजांना पर्यायाने राष्ट्रवादीला पडली होती. जिथं पक्षाच्या जेवढ्या जागा यायच्या त्यातली ही एकमेव जागा वैयक्तीक उमेदवाराच्या करिष्म्यावर येत होती. इथं पवार साहेबांचा करिष्मा नव्हता, तर उदयन महाराजांवर असणारे जनतेचं प्रेम होतं, जाणत्याचं नव्हतं.
आजही लोकांच्या मनात महाराजांबद्दल भाजपाबद्दल नाराजी असेल, पण राग नाही. उदयन महाराज या नावावर प्रेम करणारे अनेक लोक साताऱ्याच्या रस्त्यावर आहेत. पथारी टाकून बसलेला चप्पल शिवणारा माणूस, शेंगा भाजून विकणारा माणूस, आणि रात्री 12 वाजता पिक्चर बघून एकटा चाललेला विद्यार्थी महाराजांच्या गाडीत त्याच्या घरापर्यंत सुरक्षित पोहचतो त्यावेळी उदयन महाराजांचं शाही पण समोर नसतं. उदयनराजे नावाचा जिताजागता माणुसकीचा झरा, शिवाजी महाराजांचा जनतेत मिसळणारा वंशज, साताऱ्याच्या जनतेसाठी, एक नेता, एक आवाज... एवढं कानावर पडलं तरी बेंबीच्या देठापासून, उदयनमहाराज, उदयनमहाराज म्हणून ओरडणारा कार्यकर्ता महाराजांच्या शाही वागण्यापेक्षा त्यांच्या सामान्य वागण्यानं प्रेरित झालेला असतो.
पोटनिवडणुकीत उदयनराजे सुरुवातीला म्हणाले पक्ष सोडला तरी पवार साहेबांवरचं प्रेम कमी होणार नाही. साहेब पुढं असतील तर मी निवडणुकीला उभा राहणार नाही, महाराजांच्या मनात अजूनही साहेबांबद्दल प्रेम आहे. पण कालपासून साताऱ्याच्या सभेत पवार साहेबांनी पावसात भाषण कसं केलं याचे कौतुक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, स्वतःच बाळ पहिलं पाऊल टाकल्यावर जितके केले नसेल तितके साहेबांनी पावसात भाषण केले याचं केलं. मलाही पटतं, की वय कोणत्याही गोष्टीच्या आड येत नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आशावाद, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पवार साहेब. स्वतःचा उमेदवार निवडून यावा यासाठी एवढं करणं गरजेचं आहे. साहेबांनी टायमिंग साधलं, पण जनतेत मिसळणाऱ्या या नेत्याच्या मागच्या नेत्यांचं काय? साहेबांनी मॅच फिनिशरची भूमिका पार पाडण्यासाठी बॅटिंग तर जोरात केली आहे पण धोनी प्रत्येक मॅचमध्ये फिनिशिंग करू शकतो असं नाही. प्रत्येकवेळी मैदान साथ देतं असंही नाही, आणि प्रत्येक मॅचमध्ये धोनी मॅन ऑफ द मॅच होतो असं नाही. त्यामुळे मैदानात आलेल्या पवार साहेबांनी आता बॅटिंग करून उपयोग नाही. त्यांचे पहिले शिलेदार मैदानात हजेरी लावून गेलेत पण त्यांची पूर्वकर्म ही राष्ट्रवादीला तारणारी नाहीत. जुन्या लोकांची म्हण होती, आजोबांनी लावलेल्या झाडाचे आंबे नातवाने खावेत...पण साहेबांच्या पक्षातली दुसरी पिढी म्हणजे बेवड्या मुलासारखी आणि साहेबांची अवस्था नातवाच्या हातात कारभार देऊन सुखाचा घास खाण्याची आहे. त्यांनी लावलेल्या आंब्याचे, आंबे नातवाने खावेत एवढी पूर्वपुण्याई राष्ट्रवादीत शिल्लक नाही. साहेबांनी काल केलं ते पिंचहिटिंग असेल, पण मॅचविनिंग फिनिशिंग नाही, साहेबांच्या खेळीचं आणि खिलाडूपणाच कौतुक होईल पण साहेबांचं बोलणं खिलाडू नाही हे पण त्यांनी दाखवून दिलं आहे, ज्या साहेबांसाठी उदयनमहाराज माघार घ्यायला तयार आहेत, त्या महाराजांबद्दल बोलताना तो खिलाडूपणा साहेबांनी दाखवला नाही,उदयनराजेना तिकीट दिलं ही चूक होती, हे बोलणं म्हणजे. तुम्ही दिलेला माणूस चुकीचा होता हे कबूल केल्यासारखं आहे. मग या चुकीच्या माणसाला साताऱ्याच्या जनतेसमोर उभा करून तुम्ही साताऱ्याची फसवणूक केली असे नाही का? गेल्यावेळचा माणूस चुकीचा होता मग या वेळचा पण असू शकतोच ना? हा विचार जनता कशावरून करणार नाही? तुमचं हे बोलणं सुज्ञ जनता नक्की समजून घेईल,पण साहेब हरलेल्या मॅच मध्ये काहीवेळा पिंचहिटिंग करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिला जातो, पण ती खेळी मॅच विनिंग नसते, तुमची खेळी सातारकर जनता नक्की या मार्गावर घेऊन जाईल, मॅच हरलेली असेल, मॅन ऑफ द मॅच तुम्ही असाल

No comments:

Post a Comment