Friday, 17 April 2020

कमवा आणि शिका योजना - स्वावलंबी जगण्याचा पाया

ज्या हातावर भाग्याच्या रेषा नसतात, त्या हातांना रेषा स्वतः निर्माण कराव्या लागतात. अज्ञान, लाचार आणि अगतिक लोक हे हात पसरतात. पण हात पसरू नये, म्हणून त्या हातांना लाचार होऊन पसरायला लागू नये म्हणून, हातात श्रमाचा विचार देणारा कर्मयोगी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. यांच्या विचारातून उभ्या राहिलेल्या कमवा आणि शिका योजनेचा भाग मला माझ्या विद्यार्थी जीवनात होता आलं. कमवा आणि शिका योजनेतुन शिकलेला विद्यार्थी ही माझी खूप मोठी ओळख, माझ्या कॉलेजने म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरने मला दिली. घरच्या गरीब परिस्थितीने शिक्षण थांबू नये म्हणून आजही कॉलेजमध्ये कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा संस्कार केला जातो. 
मी योजनेत आलो त्यावेळी आदरणीय प्रा. दादासाहेब बाबर सर योजनेचे चेअरमन होते. योजनेत त्या वेळी 70 ते 80 विद्यार्थी असावेत पण प्रत्येक विद्यार्थ्यांला नावानिशी ओळखायचे या माणसाने आम्हांला खूप काही दिलं. काहीवेळा पैश्याची मदत न देता पण एखादा माणूस खूप देतो तसं सरांनी, कमवा शिकाचा विद्यार्थी म्हणजे कॉलेज स्टाफचा भाग आहे त्यामुळे कोणी जर तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तुमच्यावर दादागिरी करत असेल तर त्याला जाग्याला उत्तर द्या. शिवाजी विद्यापीठाच्या योजनेत शिकत असताना तिथं घडलेले किस्से सगळ्या विद्यार्थ्यांना मोकळेपणाने सांगायचे. त्यावेळी लेबर स्कीमच्या पोराला किंवा पोरीला त्याच्या ड्युटी सोडून काम सांगायची टाप कोणत्याच माणसात नव्हती. बाबर सरांना आम्ही सगळे खाजगीत हिटलर म्हणायचो पण सरांनी आमच्यावर कधी हुकूमशाही गाजवली नाही. गुणवत्ता श्रमाच्या घामाने तयार होते, हे आजही आम्हांला महत्वाचे वाटते. 
याच काळात दुर्मिळ योग म्हणजे कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉ. जे.जी. जाधव सर हेही कमवा आणि शिका योजनेत शिक्षण घेतलेले. एकाच वेळी कॉलेजचे प्राचार्य आणि कमवा आणि शिका योजनचे चेअरमन दोघेही योजनेचे विद्यार्थी असण्याचा दुर्मिळ योगायोग त्यावेळी होता. योजनेच्या कमिटी मध्ये असणारे बहुतांश प्राध्यापक हे कमवा आणि शिका योजनेचे विद्यार्थी असण्याचा त्यावेळी खूप मोठा योग त्यावेळी होता. त्यातली काही आठवणारी नाव म्हणजे, डॉ. दादासाहेब साळुंखे, सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभाग नियंत्रक, आणि सध्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य. रविवारी एका श्रमदानाच्या वेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पान उलगडली आणि आम्हांला बराच मार्ग मिळाला. दुसरं नाव म्हणजे डॉ. मारुती सातपुते, बॉटनीचे प्राध्यापक असणारे सर आम्हांला खूप चांगल बोलायचे, स्वतः कमवा आणि शिका मध्ये शिकून आणि परिस्थितीची जाणीव ठेवून राहिलेले सर बोलताना, जगण्याला हजार मार्ग भेटतात असं सहजपणे सांगून जायचे. 
चार तास काम करून आम्हांला राहायला, जेवायला आणि शिकायला मिळायचं या गोष्टीच तेव्हा काही वाटायचं नाही, पण आज त्याची किंमत कळते. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. जाधव बापू नावाचे सीनियर अकौंटंट म्हणजे विना कॅलक्यूलेटर माणूस, कितीही मोठ्या हिशेबाचं गणित अगोदर यंत्रावर जरी केलं तरी स्वतःच्या मनात योग्य आकडेमोड आल्याशिवाय पुढं जाणारच नाहीत. कदाचित त्यांचा यंत्रावर विश्वास कमी असावा असं मला नेहमी वाटायचं. पण यंत्रापेक्षा आपण फास्ट हिशेब कसा करू शकतो हे ते नेहमी दाखवून द्यायचे. या सगळ्यात एक नाव आजही महत्त्वाचे आणि आठवणीत असणारे ते म्हणजे लायब्ररीत असणाऱ्या स्वाती जाधव मॅडम योजनेत असणाऱ्या मुलांवर आणि मुलींवर स्वतःच्या मुलांइतका जीव त्या स्वतः लावायच्या. अरे नवनाथ ते गारंबीचा बापू वाचलं का एकदा वाचून घे. ही आत्मीयता आजपण अनुभवायला मिळते . 
आणि सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे आमचा सुपर हिरो असणारे कासार दादा, उंची कमी असणारे दादा, सगळयाच्या चर्चेचा विषय पण कमवा आणि शिका योजनेतल्या विद्यार्थ्यांना आपला वाटणारा माणूस म्हणजे दादा. दादा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा माणूस, हाताला न येणाऱ्या काही गोष्टी हातात घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण ते सापडत नाही. काळाच्या प्रवाहात वाहत झाल्यावर हरवलेली ही माणसं आठवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

उद्या याच्या पुढचा भाग म्हणजे :- आम्ही कमवा आणि शिका योजनेचे विद्यार्थी 

No comments:

Post a Comment